सॉरी आजोबा....
सॉरी आजोबा: एकदा आषाढी एकादशीच्या ठीक काही दिवस आधी पंढरपुरला गेलो होतो. रात्रीचे साडे नऊ वाजले होते. अर्ध्या एक तासात विठ्ठलाचे दर्शन द्वार बंद होऊन ते सकाळी पाच वाजता उघडणार होते. मी आणि माझा मित्र सोबत होतो.
आम्हाला वाटले की आषाढी अजून थोडी दूर आहे दर्शनाला गर्दी नसेल पण काय आश्चर्य! हजारो भाविक रांगेमध्ये तब्बल बारा बारा तास थांबून होते तरी त्यांचा विठुरायाचे दर्शन अजून लाभले नव्हते. भक्तांची रांग अक्षरशः पंढरपूर ते गोपाळपूर गावापर्यंत पाच किलोमीटर पर्यंत पोचली होती.
पांडुरंगाच्या दर्शनाला रांगेत घुसण्यासाठी आम्ही एक शॉर्ट कट मार्ग अवलंबिला. काही व्यक्तीसोबत ओळख करून मी पटकन रांगेत घुसलो. माझ्या मित्राला पटकन शिरता काय आले नाही त्यामुळे तो मागे पडला. त्यानंतर विठुरायाचे दर्शन मी अवघ्या अर्ध्या तासात घेतले आणि आनंदाचा मोकळा श्वास टाकला.
तद्नंतर मित्राचे दर्शन झाले नव्हते म्हणून आम्ही पहाटे चार वाजता आता आणखीनच चांगल्या प्लॅनिंगने रांगेतील वारकऱ्यंसोबत मैत्री करून, त्यांना चहा पाजून ओळख केली आणि पहाटे पाच वाजता दर्शन सुरू होताच रांगेत घुसलो.
यावेळी बाहेरून सजून थटून आलेली शेकडो माणसे, बायका रांगेत घुसल्या होत्या आणि गावाकडून पायी चालत आलेली, उपाशी पोटी बारा बारा तास आलेली मंडळी: म्हातारी माणसे, बायका, त्यांच्या सूना, मुली, नातलग हे रागीट डोळ्यांनी पाहत होते. काही जण ओरडत होते "अरे लाईन मध्ये घुसू नका…आम्ही उपाशी पोटी थांबलोय".
आमचे सकाळी सहा वाजता परत दर्शन झाले. आपल्या लाडक्या विठूचा चरणी एक पुष्प मी अर्पण केले. पण मी जे विठुरायाच्या गाभाऱ्यात पाहिले त्याने माझे मन गहिवरून आले, डोळ्यात अश्रू तरळले.
आपली वृध्द पिढी, वारकरी संप्रदाय, विठ्ठला प्रती किती भावनिक आहे, त्याच्यावर किती जीव लावते, याची प्रचिती मला आयुष्यात प्रथमच आली.
दर्शनाच्या गाभाऱ्यात विठ्ठलाचे दर्शन घेत असताना आपल्या प्रिय आराध्याला मन भरून पाहताना त्या गाभाऱ्यातून न हलणारी, परत परत मागे वळून विठ्ठलाच्या भाळावरील चंदन, पितांबरीचे लेणे, त्याच्या नेत्रातील सुखद शांतता पाहणारी ही भोळी भाबडी मंडळी अक्षरशः ढसा ढसा रडत होती.
बायका फरशीवर गोल लोटांगण घेत होत्या, दरवाज्यापासून परत परत दर्शन व्हावे म्हणून लोक उड्या मारत होते, विठुला पाहताना सर्व जणांची ओठे बोलत होती, "देवा माझ्या इच्छा पूर्व कर, माझा मोठा मुलगा दारू पितो, घरात शांती येऊ दे, सून छळते रे, पाऊस येऊन बरे दिवस येऊ दे, मला मरण शांत येऊ दे, मला दोन वेळची भाकर नशीब होऊ दे, मुलाचे भले कर!!
स्वतःच्या हाल अपेष्टांना मोकळे करायला एक भेटलेला कोपरा म्हणजे हा पांडुरंग. त्याच्या रंगात स्वतः चे दुःखे विसरून जाणारी आणि माय माउलीचा हर्षोल्लासात गजर करणारी ही बहुधा शेवटची महान पिढी!
नाशिकचे भेटलेले भूगोल, इतिहास आणि मराठीचे शिक्षक असो वा सोलापूरच्या कोर्टात वकिली करणारा तो वकील, सर्व जण या विश्वरुप चैतन्याकडे पाहून नतमस्तक होत होते. शैक्षणिक पात्रता आणि जगण्याची उंची थोडी मोठी असली तरी मनाची अबोल भावनिकता व्यक्त होते ते इथेच.
मी आणि माझा मित्र यांनी मंदिरातून बाहेर येता येता, आम्ही आजोबांना "नमस्कार माऊली" म्हणून वंदन केले. तर ते सर्वजण आमच्याच पाया पडू लागले, एवढी सहजता आणि साधेपणा माझ्या पिढी मधे कधी येईल का?
दोन गावाकडील बायका गाभाऱ्यात थोडीशी जागा करीत फुगडी खेळत होत्या. त्यांच्या टाचेला रानात काम करून करून भेगा पडल्या असल्या तरी "मी साक्षात माझ्या विठ्ठलाच्या घरात फुगडी खेळतेय" याचे अप्रुप आणि आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होते. माझे डोळे भरून आले होते, काही तरी चुकल्याची जाणीव होत होती. मी माझ्या मनाची समीक्षा केली. आपण विठ्ठलाच्या दर्शनाला मध्येच घुसून आलो, कित्येक वारकरी मंडळी दिवसभर उपाशी राहून, जमिनीवर झोपून, उन्हा तान्हात उभे राहून "एका सुंदर स्वप्नाची आता पूर्तता होणार याची प्रतिक्षा करावी तशी प्रतिक्षा करत असावीत", आणि आपल्याला काहीच हक्क नव्हता की त्यांच्या पुढे जाऊन त्यांच्या भक्तीचा, त्यांच्या भोळ्या आणि सच्चा प्रेमाच्या पुढे आम्ही येऊन उभे राहावे. विठ्ठला तुझ्या प्रिय भक्तांना तुला भेटायला आमच्या मुळे उशीर झाला असेल तर आम्हाला समजून घे.
प्रिय आजोबा मी चुकलोच आहे, आपल्या नातवाला क्षमा कराल अशी अपेक्षा आहे. सॉरी आजोबा!
Harish
Comments