सावित्री


Dedicated to dear women❣️

१९८० च्या निवडणुकीत इंदिरा गांधीं दुसऱ्यांदा पंतप्रधान बनल्या होत्या.स्त्रियांसाठी अच्छे दिन येणारं अस वाटत होत.देश गुलामी च्या पाशाचे एक एक कडे तोडत होता.सिनेमा मधे ही स्त्रीचे अपहरण,बलात्कार, छळ त्यावर नायकाची हीरोगीरी यांवर च कथानक येत होती. स्त्रियांच्या वस्त्रहरणला सिनेमात मान्यता मिळून प्रेक्षकांच्या ही त्यावर शिट्ट्या टाळ्या येत होत्या.

स्त्रियांबद्दल ची पुरुषी मानसिकता तेव्हा जास्तच विखारी होती.अशा वातावरणातील ही सुनंदा ची कथा!


सुनंदा! सुनंदा हजारे. सत्ताविशितील देखणी तरुणी,चेहरा रेखीव, कपाळी लाल टिकली,कानात सूर्यफुलासारखी डुलणारी कर्णफुले,पायात पैंजण,डोळ्यात सात्विकता,ती हसल्यावर रुसलेला व्यक्तीही स्मित करेल अशी साजूक ती.विचारांनी अत्यंत प्रखर, आधुनिक. पण अंतर्मनात कुठेतरी खोलवर जखम झालेली,आतल्या आत विचार करणारी, गुरफटणारी अशी ही सुनंदा.


अंबाजोगाई तालुक्यापासून २० किलोमीटर अंतरावर एक खेडेगाव आहे "बनेगाव" तिथल्या जिल्हा परिषद शाळेवर सुनंदा शिक्षिका म्हणून कार्यरत होती.ती त्याच गावात "सावित्री सोनवणे " च्या इथ भाड्याने राहायची. पत्राच्या व्यवस्थित दोन खोल्या.

सावित्री ही सुनंदा हुन दहा वर्षाहून अधिक मोठी,शिक्षणाने कमी पण बोलण्यात तरबेज,कोणाच्या बापालाही न भिणारी,शेतात राब राब राबणारी,एक म्हैस सांभाळणारी.


सात वर्षा पूर्वी सुनंदा चे लग्न हनुमंत सोबत झाले होते. तिचे लग्न मुलाकडील श्रीमंती पाहून लावलेले.पण काही वर्षातच घराला अवकळा आलेली होती. सुनंदा ला एक पाच वर्षाची मुलगी व एक ३ वर्षाचा मुलगा होता.

सूर्यावर आभाळ देवतेचा पडडा पडला होता.सावित्री रेडिओ वर भक्ती गीत ऐकत होती "पंढरीच्या विठुराया".

अंधार झाला पण अजून सुनंदा काही आली नव्हती.

बाहेर पाऊस सुरू होता, घरावरील पत्र्यावरून पाणी "टीप टीप" गळत होते,सुनंदा चा छोटा मुलगा अविनाश व मुलगी रागिणी, सावित्री पशी बसून तिची वाट पाहत होते,अविनाश दुरून म्हशी च्या गळ्यातील वाजत असलेली घंटा न्याहाळत होता.रागिणी रस्त्यावरून जाणारी वाहने मोजत होती "आता ट्रक येणार,आता बस येणार...ती बघ जीप"

तितक्यात रागिणी मधल्या दगडी तुटक्या कंपाऊंड मधे "आई आली,आई आली" अस म्हणत सुटली.छत्री न्यायची विसरलेली सुनंदा चांगलीच भिजली होती,तिने तिच्या निरागस अशा अविनाश व रागिणी ला कवटाळून जवळ घेतले जणू तिच्या दिवसभराच्या दगदगीचा शीणच उतरला.

घरात फडक्याने केस पुसून तिने साडी बदलली,आणि पलिकड पाहिलं तर काय! तिचा नवरा हनुमंत दारू पिऊन बेशुद्ध पडलेला होता. तो मुंबई हुन कामावरून परत आला होता.

 त्यानं वडिलांची सारी संपत्ती दारू मधे वाया घालवली होती.जेव्हढी जमीन होती ती विकून सारे धन मातीमोल केले होते.

सुनंदा घर आवरून स्वयंपाकाला लागली आणि  तितक्यात हनुमंत जागा झाला व सुनंदा कडे येऊन म्हणला "सूनंदे मला पैसे दे,मला तंबाकू खायचीय,चुना बी संपलाय" सुनंदा ने नकार देताच तो ओरडला " देतीस का नाही का तोंड फोडू तुझं"

सुनंदा ला ठाऊक होते याला पैसे दिल्यास हा दारू ढोसून येईल. सुनंदा म्हणली "माझ्याकडं नाहीयेत पैसे,जेवण करा आणि झोपा" तितक्यात हनुमंत दरडावून अंगावर धावून गेला "तोंड चालवतेस फुकने" म्हणत त्याने सुनंदा च्या कोवळ्या गालावर एक चापट ठेऊन दिली व बाहेर निघून गेला. सुनंदा एका कोपऱ्यात जाऊन बसली तिच्या डोळ्यात अश्रू होते,शेजारी तिचे चिमुकले कावरी बावरी होऊन भीतीने सार काही पाहत होते,कोवळी रागिणी आई काय झालं म्हणत आई जवळ जाऊन बसली.सुनंदा चा गाल लाल झाला होता.

बाहेरून कपाळाला गोल घुमट कुंकू लावलेली सावित्री आली,तिच्या हाता मधे एक दुधाचा पेला व थोडा शेतातून आणलेला भाजीपाला होता.तिने अविनाश ला आपल्या कुशीत घेतले.सुनंदा चे हे दुखणे तिले चांगले ठाऊक होते.

नवरा पैसे संपले की गावी येतो,बायको सोबत जबरदस्ती करून,मजा मारून निघून जातो.

सावित्री सुनंदा ला धीर देत म्हंटली "रडू नको पोरी,थोडा दम धर पोरी,त्या राक्षसाला भिऊ नको,तू खचल्यावर तो पुरता गिळून टाकील तुला,आपल्या सोन्या सारख्या लेकरा कडे बघ"

दुसऱ्या दिवशी सुनंदा शाळेत गेली. राष्ट्रगीताला समोर थांबलेल्या दोन शिक्षकांची तिच्यावर वाईट नजर होती.तिच्या नवऱ्याच्या वर्तणुकीचा गैरफायदा ते घेऊ पाहत होते.

सुनंदा वर्गामध्ये शिरणार इतक्यात तिला तट मास्तर ने अडवले " सुनंदे अग तुझा नवरा बेवडा तो काय तुला सुख देणार,अग अख्खं आयुष्य पडलय 

तुझ्याकडे.... आ...बोल की!! अख्खं गावात थुकत तुझ्या नवऱ्यावर,तू कवर अशी सामसूम राहणार,तुझं दुःख माझ्याच्यान बगवत नाही"

सुनंदा बोलली "खबरदार तट मास्तर हद्दीत रहा" आणि ती वर्गात गेली.

मधल्या सुट्टीत चव्हाण मास्तर तिला  म्हणला "वो सुनंदा बाई,कस काय मग? सर्व ठीक! नाही आमच्याकड नजर नाही म्हणल तुमची,थोडी पार्टी बिर्टी द्या की आम्हाला.शेतावर आज कोंबड कापायच होत थोडे पैसे देकी आम्हाला!नाही तर तुम्हीच चला की पार्टी ला.

आणि तिथले दोन तीन शिक्षक मोठ्याने दात काढू लागले.

सुनंदा चा घरचा एक पाय लंगडा होता म्हणून च की काय हे नवीन सामाजिक त्रासाचे दुखणे.सुनंदा ला समजेनासे झाले काय करावं.

सुनंदा ने त्या नराधमाना दखल ही दिली नाही.शाळा सुटल्याची घंटी वाजली आणि सुनंदा घरी आली.झालेला प्रकार तिने सावित्री ला सांगितला.

अविनाश आईच्या कुशीत पहुडला होता,रागिणी टक लावून सुनंदा कडे पाहत होती.


सावित्री ने चहा बनवून दिला डोळे मोठे करून तिन मायेने समजावलं "पोरी खंबीर रहा,असले भामटे गावोगावी आहेत,जेवढ तू त्यांना भेशील तेव्हढे ते तुला भीती घालतील,घे चहा घे"

सायंकाळी सात ची वेळ होती.सुनंदा अविनाश ला खाऊ भरवत होती.

तितक्यात सुनंदा चा नवरा हनुमंत बेधुंद नशेत,डुलत डुलत आला,आज त्याचे कपडे ही फाटले होते.हनुमंत घराबाहेरुनच ओरडला " सुनंदे, सुनंदे...कुठ खपलीस,तुझा नवरा आलंय तरी तू मधी काय करतीस.हे बघ मी काय आणलय" 

सुनंदा नवऱ्याचा आवाज ऐकुन बाहेर पळत आली.पाहते तर काय हनुमंत च्या हातात एक मेलेली कोंबडी.

"चल मला हे बनवून दे,भाजी चांगली कर,आणि हे चिवडा धर लेकरांना"

पाच सहा माणसे हा तमाशा बघत थांबले होते.

हनुमंत कडे मगा पासून पाहत असलेली सावित्री त्या थांबलेल्यावर ओरडली "तुमच्या घरी का बायका लेकरे नाहीत का, जावा ना तुमच्या घरी,आणि तू हनुमंत रस्त्यावर कालवा करायचा नाही,मधे हो"

हनुमंत घरात आला "सूने ऐक मला पैसे पाहिजे होते थोडे,नोकरी बी गेली माझी"


सुनंदा कडे घर चालवण्या इतकेच पैसे उरले होते,येणारी पगार घर चालवण्यात, किराणा,दूध नवऱ्यावर जात होती.हनुमंत ला अलीकडे दारू सोबत मटका,जुगाराचा ही नाद लागला होता.

 तिने हनुमंत ला समजावले "सावित्री काकू चे पैसे द्यायचे राहिलेत अजून,घरात भाजीपाला पण नाही"

"काय करतीस पगार एवढा ,कोणावर उधळतीस,जास्त शिकवू नको,आणि पैसा नसला म्हणून काय झालं

ते तुझ्या पायातले जोडवे आणि कानातल तर आहे ना"

अस म्हणून हनुमंत ने मान मुरगाळून सूनंदाच्या कानावर झडप घातली,आणि कानातले कर्णफुले ओढू लागला" कान

ओढल्याच्या त्रासाने

सुनंदा चित्कारली "अहो,अहो......मी देते कानातले"

हनुमंत ने एक गाला वर शिलगावून पायातले जोडवे ही काढून घेतले...

तिची चिमकली मुले हा उद्ध्वस्त आयुष्याचा खेळ खंडोबा भीतीने,रडून पाहत होती.

सुनंदा ला आक्रोशान हुंदका भरला,जा आता भेटले ना जोडवे.

हनुमंत न नकारार्थी मान हलवली

"ते राहिलय अजून,ते बी दे"

सुनंदा डोळे मोठे करून चिंतेने बोलली "ते काय"

हनुमंत ते बोट दाखवलं "तुझं मंगळसूत्र"

सुनंदा क्षणभर सुन्न झाली..."अहो,तुमच्या जिभेला हाड बिड आहे की नाही"

सुनंदा ने साडीच्या पदराने मंगळसूत्र झाकण्याचा प्रयत्न केला.

"मला शहाणपणा शिकवू नको" म्हणत

हनुमंत ने सुनंदा ला पुढे खेचले व तिच्या गळ्यातील मंगळ सूत्र ओढले,त्या मंगळसुत्रातील मनी कावरे बावरे हुन इकडे तिकडे पळत होते. झटापटीत अर्धे मंगळसूत्र तुटून हनुमंत च्या हातात आले.

मंगळ सूत्र तोडू नये म्हणून हात गळ्याशी लावणाऱ्या सुनंदा च्या हातामध्ये मंगळसूत्राचा तुटलेला धागा शिल्लक होता.

तो तिने हनुमंत च्या तोंडावर फेकून मारला आणि म्हणाली "घे हे तुझं मंगळसूत्र,आज पासून तू वाट भेटेल तिकडे जायला मोकळा आहेस.

तुझा आणि माझा संबंध संपला.माझ्या सौभाग्याचं लेण तुटलं.

माझं  मंगळसूत्र तुटलं,इथ संपलं सगळ.

हनुमंत रागारागात घरातून निघून गेला,दोन चिमुकली पोर आणि सुनंदा धायमोकलून रडत होते.सावित्री ला हा सारा प्रकार समजला.

त्या तिघांना सावित्रीने स्वतः च्या घरात बसवले,जेवू घातले.सुनंदा ला जेवण जात नव्हते...ती तशीच सावित्री पशी बसून मुसू मुसु रडत होती.सांगत होती,"मावशी,माझ्या बापाने माझं वाटोळ केलं...का म्हणून याच्या पदरी घातलं मला ,याच्या धनाला काय जाळायचं होत का? असा हंबरडा फोडत ती भिंतीला टेक देऊन वर पत्र्यावरील कोळ्याच्या जाळ्याकडे पाहत होती.त्या जाळ्यात ती स्वतः  अडकल्याचे भासले. आपल्या समाजाचं जाळ ज्यात मुलीला विचारल ही जात नाही की तिची पसंद काय आहे! मुलगा कसा आहे,वयान किती का मोठा असेना स्त्री वर सार काही लादलेल चालत. बाईचं आयुष्य असच असत म्हणून समाज आपले डोळे मिटून सर्व दुःखावर पांघरूण ही घालतो.

समाज कितीही प्रगत झाला तरी आपल्या इथ मुलगी एखाद्याच्या मनात नाही तर केवळ घरात जाते. एखाद्या 

मुलीला पाहिजे काय असते आयुष्यात आदर,थोडंसं प्रेम, काळजी इतकं जरी तिला नवऱ्यानं दिलं तरी ती इतरांवर प्रेमाचं आकाश खुल करते.


सुनंदा दोन तीन दिवस शाळेत गेली नाही. काही काळाने सुनंदा ने मुलीच्या शिक्षणासाठी तालुक्याला स्थायिक होण्याचे ठरवले.आता तिच्या आयुष्यात जगण्यासाठी उरले काय होते केवळ "तीची दोन सोन्यासारखी मुले"

सुनंदा अंबेजोगाई ला राहू लागली.बस ने जिल्हा परिषद शाळेला ये जा करायची.आता तट आणि चव्हाण मास्तर यांनी परत त्रास द्यायला सुरु केला.शाळा सुटल्या नंतर सुनंदा बस थांब्यावर बसची वाट पाहत बसायची.तेव्हा या दोन मास्तरांनी तिच्या मागे दोन चार लहान लावली,जे की तिच्यावर दगड ,माती टाकतील तिची साडी भरवतील.

शाळा सुटल्या नंतर दोन्ही मास्तर तिच्या मागे मागे येऊ लागले.दुरून शिट्ट्या फुंकणे,मोठ्यानं दादा कोंडके ची गाणे म्हणणे,चल पार्टीला जाऊ अस म्हणत टवाळक्या सुरू झाल्या.सुनंदा ला या गोष्टी असह्य झाल्या.एके दिवशी संध्याकाळी ती सावित्री काकू कडे गेली व म्हणाली "काकू,मी वैतागले हो...हे जनावर माझ्या मागे लहान मुले लावतात, माती फेकतात,दारू पिऊन गाने म्हणतात,मी काहीच केलं नाही तर एके दिवशी हे पदर ओढायला ही मागे पुढे पाहणार नाहीत,आता तुम्हीच माझी मदत करा" अस म्हणत सूनंदाने आर्जवी विनंती केली.

त्यावर सावित्री बोलली "पोरी,मी दिवसभर शेतात काम करायलेली असते,पण जवा सूर्य मावळतीला येईल तवा मी एसटी स्टँड वर येते.तू काळजी नकु करू"

दुसऱ्या दिवशी शाळा सुटाय ची वेळ झाली,सावित्री कंबरेला पदर खेचून हातात एक काठी घेऊन शेतातून निघाली.बस थांब्यावर सावित्री थांबली होती. तट मास्तर व चव्हाण मास्तर आणि दुसरे टोणगे गिधाडासारखे घिरट्या मारत होते.

"मेरी सपनो की रानी कब आयेगी तू....तमाशा पाहायला येती का सुनु?" 

तेवढ्यात सावित्री मावशी तिथं 

"हो येती की, सोबत तुझ्या आया बहिणीला बी बसवं आणि नाचवं त्यांना बी, मुडद्या आर तीन लेकराच बाप हाईस की...कोण जर उद्या पास्न इथ दिसल र त्याचे हात पाय तोडते,मी हाय आणि तुम्ही हाव! "

अस म्हणत सावित्री मावशी नी काठी वाजवली.

आणि सारे लांडगे पळून गेले.

सुनंदा ची बदली होई पर्यंत

सावित्री दररोज संध्याकाळी बस थांब्यावर यायची आणि बस मधे बसवायची.

महिलांनी महिलांसाठी पुढे आलं पाहिजे,त्यांचं जगणं समजून साद घातली पाहिजे.सर्व सावित्री,सर्व स्त्रिया एकत्रित झाल्यावर कोणाची हिम्मत आहे समाजात त्यांचा पदर खेचण्याची?

प्रत्येक मुलीला आयुष्यात ज्योतिबा सारखा जोडीदार भेटेल अस नाहीच सावित्री सारखी एक सखी हवीच!


*Harish Vrindavan*🍁

Comments

Unknown said…
👍🏻👌🏻👏🏻👏🏻
Unknown said…
Great🙌👏👌❣️...Nice message to today's Indian society
Sagar Mashalkar said…
Mast Harish 👍 keep it up
Samiksha said…
Khup chan👌👌👍
Sejal Kothe said…
Apratim harish bhaiya..🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻
DSD said…
Nice ,very deep and reader completely gets involved in it

Popular posts from this blog

MS Dhoni: Once in Generation | English

Sports: Who will be the contender for the fourth position in the 2023 World Cup?